तुझ्या लक्षात राहत नाही का? स्मरणशक्ती

शिक्षण : शाळा ते करिअर 

 पालक शिक्षक आणि सर्वांसाठी 


तुझ्या लक्षात राहत नाही का? स्मरणशक्ती 

Click here to buy fire tv stick

तुझ्या लक्षात का नाही राहत ?
समजत नाही का ?
विसरलास वाटतं !!!
आठवत नाही तुला ?

असे एक ना धड भाराभर चिंध्या असणारे प्रश्न आपण आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना सतत विचारत असतो .बोलत असतो ,परिणाम करत असतो ,खरंच आपल्याला तरी किती गोष्टी आठवतात हो !  आपण सगळेजण शाळेत गेलो होतो आणि जर आपल्याला प्रश्न विचारला कि,' शून्याचा शोध कोणी लावला?' तर आपल्याला आठवेल का? विसरलो मी .... असं सहज बोलून जातो.


                                 आपल्याला आपल्या लहानपणीच्या पहिलीच्या शिक्षक किंवा वर्गात शिकलेले एखादी गोष्ट आता आठवते का ?आणि एकदा शिकवलेली गोष्ट मुलाने प्रत्येक वेळी लक्षात ठेवून त्याची उत्तर दिले पाहिजे एवढी मोठी अपेक्षा ठेवतो .खरच खर आहे का हो हे...... नाही ना..... मग आठवणे, लक्षात ठेवणे , समजणे म्हणजे काय ??? चला पाहूया......

                        एकूणच माणूस ज्ञान कसे मिळवतो?  कसे शिकतो?  आणि कसा विचार करतो हे पाहूया. आपण जेव्हा एखादे दृश्य बघतो तेव्हा त्या संवेदनांवर आपण काही प्रक्रिया करतो, त्यातून सहजपणे जे निष्कर्ष निघतील ते मग आपल्या जाणिवेत सामील होतात .म्हणजेच दोन न्यूरॉन्स एकमेकांना सिनॅप्सच्या एका फटीत जोडले जातात . हे आपण जाणतोच. यासिनॅप्समध्ये जेव्हा बदल होतात. तेव्हा आपण माहिती मिळवत असतो आणि ठराविक सिनॅप्सेस जेव्हा वारंवार क्रियाशील ऍक्टिव्हेट होतात तेव्हा ती गोष्ट आपल्या मनात पक्की होत असते म्हणजेच थोडक्यात आपण ती गोष्ट शिकत असतो .


                                जेव्हा काही सीनापसेस बरेचदा क्रियाशील होतात ,तेव्हा एकमेकांशी जास्त पक्की बांधली जातात .अशा एकमेकांशी बांधल्या गेलेल्या अनेक  न्यूरॉन्सची एक सर्किट पक्की होत असतात .आपल्या मेंदूत 10 हजार कोटी न्यूरॉन्स  पेशी असतात. त्यातली अशी पक्की झालेली सर्किट्स आपली स्मृती आणि आपण शिकलेल्या गोष्टी दाखवत असतो.


                          जेव्हा आपण आपल्या स्मृतीतला एखादा शब्द किंवा कल्पना आठवतो तेव्हा मेंदूतले कुठली न्यूरॉन्स सक्रिय होतात हे पाहून मोजू शकतो पण आपण कुठलीही गोष्ट कशी मिळवतो ? ती का शिकतो?  एखादी वस्तू कशी ओळखतो ? बोलताना विशिष्ट शब्द कसे आणि का वापरतो, हे मेंदूच्या अभ्यासावरून कळत नाही .स्मृती( मेमरी), भाषा (लैंग्वेज) आणि तर्कबुद्धी (रीजनिंग) अशा अनेक गोष्टी म्हणजे मेंदूतल्या न्यूरॉन्स मधल्या आणि त्यातल्या रसायनं मधल्या प्रक्रिया आहेत आपण लक्षात ठेवतो.

Read , learn and play 

      या प्रक्रियेमध्ये तीन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात .

एक म्हणजे माहिती मिळवणे, 

दुसरे म्हणजे ती साठवण 

आणि तिसरी म्हणजे ती पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली की बाहेर जाणं.


                          या तीन गोष्टी मध्ये एका गोष्टीत जरी गडबड झाली, तरीही आपल्या स्मृतीत गोंधळ उडू शकतो आणि मग आपल्याला गोष्ट नीट पण आठवत नाहीत .उदाहरणार्थ आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे त्या वेळी आठवत नाही पण काही वेळाने ती आपल्याला आपोआपच आठवते किंवा त्या शब्दाच्या पहिले अक्षर आठवलं तर मग ती आठवते याचा अर्थ त्या आपल्या स्मृतीतून पूर्णपणे नष्ट झालेली असते असं नाही .....                           एखाद्या टोपलीत जशा आपण वस्तू जमा करत जातो तशा गोष्टींच्या घटनांच्या आठवणी आणि कल्पना आपण डोक्यात मनात साठवत जातो. जेव्हा आपल्यासमोर काही माहिती दृश्य किंवा विचार येतात तेव्हा आपल्या मेंदूतल्या विशिष्ट न्यूरॉन्स क्रियाशील होतात .या सगळ्यांनी न्यूरॉन्सला जोडणारा एक मेमरी ट्रेस  म्हणजेच स्मृतीत सर्किट तयार होतात. तीच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर आली वाचली किंवा आठवली तर हे ठसे गडद किंवा पक्के होत जातात आणि मग त्या गोष्टी आपल्या लक्षात राहतात हे मेंदूचे ठसे नक्की कुठे आणि कसे उमटतात याविषयी अजूनही पूर्णता आपल्याला माहिती नाही पण मेंदूतल्या टेम्पोरल लोब पुन्हा विद्युत उद्दीपित केल्यावर पूर्वीच्या गोष्टी आठवायला लागतात. हे आता लक्षात आलं .


                    आपला या स्मृतींचे तीन टप्पे पडतात .


पहिली स्मृती असते क्षणिक स्मृती.
 दुसरे असते लघुरूप कालिक किंवा अल्पकालिक स्मृती 
आणि तिसरी असते दीर्घकालिक स्मृती


                     या तीन पातळ्यांवर आपलं लक्षात राहणं ठरतं .आत्तापर्यंत बराचसा भाग हा पण मेंदू विचाराचा बघितला पण प्रत्यक्ष उदाहरणांवरून आपण समजून घेऊया नक्की मुलांच्या किंवा आपल्या स्मृतीमध्ये काय घडतं ...
...

जेव्हा आपण 4 हा आकडा बघतो. तेव्हा तो प्रथम आपल्या बफर मध्ये जातो. हा बकर  म्हणजे काय ? तर पाहणे ,ऐकणे ,स्पर्श करणे , चव घेणे ,वास घेणे या आपल्या पंचज्ञानेंद्रिय यांच्या माध्यमातून ज्या संवेदना आपण अनुभवतो त्यामुळे आपण पाहिलेल्या अनुभवलेल्या गोष्टी आठवत राहतात. पण त्यातल्या काही गोष्टी पुढच्या वेळी जाणवल्या तरी त्या टिकत नाहीत .


                                      बफर मध्ये 4 याकडे चित्र किंवा प्रतिमा असते ,पण हा आकडा आहे ,त्याला काहीतरी अर्थ आहे ,तो एक दोन आणि तीन पेक्षा मोठा पण पाच पेक्षा लहान आहे वगैरे गोष्टी .त्यावेळी आपल्याला जाणवलेल्या नसतात त्यांच्यावर किंचितशी प्रवेश प्रक्रिया झाल्यावर आपण त्याचा अर्थ लावतो. पण ती गोष्ट अल्पकालिक स्मृतीमध्ये ठेवतो .अल्पकालिक स्मृतीमध्ये ही सर्वसाधारणपणे एक ते दोन मिनिटे टिकते.                            मित्रांनो आता मला सांगा आपण आपल्याकडे शिकायला आलेल्या मुलाला एक ते शंभर अंक शिकवतो तेव्हा आपण फळ्यावर  एक तर त्याला चिन्ह काढून दाखवतो आणि मग त्याला सांगतो याला एक म्हणतात ,याला दोन म्हणतात, याला 10 म्हणतात .पण त्याच्या स्मृतीमध्ये तो आकडा लक्षात राहत नाही .म्हणजेच त्यावर प्रक्रिया होत नाही .


                            तर तो डोळ्यांनी पाहत नाही ,हाताने स्पर्श करत नाही ,त्याला वास आहे का ?चव आहे का ?हे पंचज्ञानेंद्रिय यांनी प्रत्येक गोष्ट आपण ज्या वेळेला न्याहाळतो ,लक्षात ठेवतो, त्या वेळेला ती प्रक्रिया घडते आणि अशा वेळेलाच त्या गोष्टी स्मृतीमध्ये दीर्घकालीन राहतात.


                          मित्रांनो मुलांच्या बाबतीतही असंच घडतं. अल्पकालीन स्मृती साधारणत एक ते दोन मिनिटातच टिकते आणि म्हणून एखाद्या गोष्टीविषयी ती न समजणे तिची प्रक्रिया न होणे याचा अर्थ न लागणे यामुळे अल्प कालीन स्मृती ते राहते किंवा निघून जाते .

                           अल्पकालीन स्मृतीमध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे हर्बल्स. यात आकडे , अक्षर ,शब्द वगैरे गोष्टी मोडतात आणि दुसरा भाग असतो कॉन्सेप्च्युअल्स यात वेगवेगळ्या संकल्पना येतात .पहिल्या भागामध्ये एखादे वाक्य लक्षात राहील तर दुसऱ्यात त्यामागची कल्पना किंवा त्यातलं म्हणून लक्षात राहतं.


 म्हणजेच बघा,"  मी कोल्हापूरला उन्हाळ्यात गेलो ." हे वाक्य ," चप्पल खाल्ली पाऊस डोंगर झोपल्यावर नद्यांनी झुडपं विमान."  या वाक्य पेक्षा जास्त चटकन लक्षात राहिल .याचं कारण पहिला वाक्यामध्ये आपल्याला ते वाक्य वाचल्यानंतर कोल्हापूर ,उन्हाळा, गेलो  या शब्दांचे अर्थ समजल्यामुळे लक्षात राहतं. मात्र दुसऱ्या वाक्यांमध्ये फक्त आणि फक्त शब्दच आहेत .त्याचा अर्थ लवकर लागत नाही आणि त्यामुळे ते वाक्य आपल्या स्मरणात राहणार नाही .

                    मुलांच्या बाबतीतही अशाच मूर्ती अशा गोष्टी घडत असतात मुलांमध्ये दीर्घकालीन स्मृतीमध्ये राहण्यासाठी च्या गोष्टी कशा घडतील हे आपण आता पाहणार आहोत 


                   मित्रांनो जेव्हा आपण एखादं एक संत्र पहिल्यांदा बघतो तेव्हा त्याचे गुणधर्म आपण निवडत असते .त्याची वैशिष्ट्ये ,त्याची लक्षण काय आहेत  हे आपण लक्षात ठेवतो. म्हणजे ते फळ आहे हे आपल्याला कळतं तेव्हा ते फळांचे आधी जाऊन बसत.
जेव्हा ते आंबट आहे आपल्याला कळतं मग ते आंबट पदार्थांची यादी जाऊन बघते. अशा सगळ्या गोष्टींची यादी ते जाऊन बसते. मग ते फळ असो. मग संत्री कुठे मिळते आपल्याला समजतं मग त्याही जागांच्या यादीत जाऊन बसतं. त्याची नारंगी साल पाहून आपल्याला नारंगी रंगाच्या सगळ्या गोष्टींचा यादीत जाऊन बसतं. संत्र्याला इंग्रजीत ऑरेंज म्हणतात. मग हेच नाव एका मोबाइल सर्विस देणाऱ्या कंपनीचा आहे. मोबाईल सर्विस देणाऱ्या सगळ्या कंपन्यांच्या यादीत नाव जाऊन बसतं .


                                        मित्रांनो कम्प्युटरच्या डेटाबेसमध्ये जशी आपण क्वेरी विचारतो .तशा नंतर कोणी आपल्याला वेगवेगळ्या खाली दिलेल्या क्वेरीज प्रश्न विचारले तर त्या सगळ्यांमध्ये संत्र किंवा ऑरेंज हे नाव येईलच.
 म्हणजेच सगळ्या माहीत असलेल्या फळांची यादी करा .
सगळ्या आंबट पदार्थांची यादी करा.
 सगळ्या मोबाईल कंपन्यांची नावे सांगा .
यामध्ये आपणास संत्र किंवा ऑरेंज हेच येणारच आहे आणि म्हणूनच मेंदूमध्ये दीर्घकालिक स्मृतीमध्ये हे ऑरेंज संत्र अशा वेगवेगळ्या पद्धतीने जाऊन बसतं .

                                 

            मित्रांनो एवढे सगळं आपण मुलांच्या बाबतीमध्ये अंक शब्द त्यांचे अर्थ याबाबतीत या सर्व गोष्टी आपण करतो का आणि म्हणूनच मुलांना ती गोष्ट समजलेली नसते .मुलांना ते लवकर आठवत नाही .ही म्हणून आपल्या डेटाबेसमध्ये ही गुंतागुंत होण्यासाठी आपल्याला असंख्य नेटवर्क जोडावे लागतात. दुसरे उदाहरण जर आपण पाहिलं तर समुद्र हा शब्द आपल्यासमोर आला तर .....

आपल्याला आठवतो तो समुद्र जो आपण जहाजातून बायकोबरोबर गोव्याला गेलो होतो ,ती सहल आठवते .त्यातली खरेदी केलेला कॅमेरा आठवतो .त्या कॅमेराने सातारमध्ये अजिंक्यताऱ्यावर काढलेला फोटो आठवतो. त्या फोटोमध्ये दिसणारे आजी-आजोबा आठवतात. आजोबा लहानपणी सांगत असलेल्या गोष्टी आठवतात .आजोबांनी सांगितलेली भिम आणि बकासुर ची गोष्ट आठवते. त्या गोष्टीमध्ये भीमाने बकासुराचा वध केला हे आठवतं. त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. त्याचबरोबर आजोबांनी घातलेले गांधी टोपी आठवते. ती टोपी वरून गांधीजी आठवतात .गांधीजीं वरून खादी आठवते . परवा खरेदी केलेला खादीचा शर्ट आठवतो .तो शर्ट घालून 15 ऑगस्ट च्या कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहण केले आठवते. त्या  दिवशी खाल्ली जिलेबी आठवते. आपल्याला मध्येच आपल्या जुन्या मित्राची आठवण होते .                               अशा सर्व गोष्टी एकामागोमाग आपल्या स्मृतींच्या डेटाबेसमध्ये साखळी किंवा लिंकेज मुळे निर्माण होतात. ही साखळी जोपर्यंत आपल्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीबाबत निर्माण करत नाही .तोपर्यंत मुलांच्या स्मृती दीर्घकालीन राहणार नाहीत आणि म्हणून जेवढे जास्तीत जास्त लिंकेज आणि साखळ्या मुलांच्या स्मृतीमध्ये तयार होतील .तेवढ्या मुलांच्या त्या क्षमता गोष्टी संकल्पना कायमस्वरूपी स्मरणात  राहतील आणि म्हणून आपण एखादी गोष्ट मुलांना शिकवत असतो किंवा मुलं शिकत असतात तेव्हा जेव्हा त्यांची साखळी निर्माण होते तेव्हा ती मुलं चांगल्या प्रकारे शिकतात आणि त्यांच्या लक्षातही राहतं. मित्रांनो आजची शिक्षण पद्धती अशीच आहे त्यातील गणित विषयाचे आत्ताची पद्धत आपण पाहणार आहोत.


                              मित्रांनो आपण गणिताबद्दल भाषेची संकल्पना समजून घेऊया .


गणिताला अनेक भाषा असतात त्यातील आठ भाषा आपण समजून घेऊया.  एक वस्तू भाषा, दोन चित्रभाषा, तीन कृती भाषा, चार ध्वनि भाषा, पाच बोटांची भाषा, सहा चलन भाषा ,सात गोष्ट भाषा, आठ अंक भाषा. मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे नवीन काय तर आपण हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे ऐकलेला आहे अभ्यास केलेला आहे. या भाषांच्या माध्यमातून 2( दोन ) हा अंक मुलाला समजण्यासाठी आपण आणि मुलांना दोन पेन्सिल दाखवणे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय याच्या आधारे मुलाला त्याची संकल्पना समजून देणे .
दोन पेन्सिली, दोन पेन्सिल चे चित्र ,दोन उड्या मारणे ,दोन टाळ्या वाजवणे, दोन बोट दाखवणे, दोन रुपये दाखवणे ,माझ्याजवळ दोन पेन्सिली आहेत असे सांगणे ,2 हा अंक लिहिलेले अंक कार्ड दाखवणे .
या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे 2 ही संख्या. 2 ही संख्या म्हणजेच किती हे जेव्हा मुलाला अशा अनुभवांना द्वारे समजेल तेव्हा 2 मुलाच्या दीर्घकालीन स्मरणात राहिल. एवढ्या सगळ्या प्रक्रिया म्हणजेच लिंकेज किंवा साखळ्या तयार करणे.                        म्हणून अशा साखळ्या प्रत्येक अंक गणित मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार किंवा भाषेमध्ये असणारे शब्द त्यांचे अर्थ विविध संकल्पना यामध्ये आपणास निर्माण करावे लागतील.एवढेच काय तर बघा आपण लहानपणी सायकल चालवाय शिकलेला असतो .मोठे चाळीस वर्षाची झाल्यानंतर आपण सायकल चालवायचे विसरत नाही याचा अर्थ काय तर सायकल चालवणे ही जशी क्रिया साखळ्यांनी जोडलेली घडते ती क्रिया आपल्या दीर्घकालीन स्मरणात राहते आणि आपण जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा आपण ती न विसरता पुन्हा आपल्या सर्व क्षमतांचा पुरेपूर वापर करून आपण सायकल चालवतो याचा अर्थ दीर्घकालीन स्मृती राहण्यासाठी आपणाला साखळी किंवा लिंकेज तयार करावे लागतील. असे लिंकेज जर आपण मुलांच्या प्रत्येक क्षमता कौशल्य संकल्पना याबाबतीत तयार केल्या तर मुलांची स्मृती दीर्घकालीन राहील.


                                     मित्रांनो जावली तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय श्री रमेश चव्हाण साहेब जेव्हा वर्गात येतात तेव्हा त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप साधारणतः पुढील प्रमाणे असते.त्यांचा प्रश्न असतो मी एक वाक्य सांगतो ते तुम्ही लिहा साहेबांच वाक्य असतं,"  पावसात मुले कागदाच्या होड्या बनवून खेळत होती." हे वाक्य लिहायला सांगितल्यानंतर यातील जोडाक्षरे किती? त्या शब्दांचे अर्थ? पावसाळा म्हणजे काय? पाऊस कसा पडतो ?कागद कसा तयार होतो ?कागदाची होडी कशी बनवावी ?कागद तयार करण्यासाठी काय लागते ?पाऊस पडण्यासाठी आणि कागद बनवण्यासाठी झाडाची गरज लागते मग झाड सजीव की निर्जीव ?झाड काय खाते ?झाड आपल्याला काय देते ?झाडाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात ?त्या शब्दाचा यमक जुळणारे शब्द कोणता? यावरूनच गणिताचा प्रश्न  तुमच्या शाळेमध्ये  वृक्षारोपणासाठी शिक्षकांनी 5000 झाडे आणली असतील , तर त्यामध्ये फळांची झाडे 2621 , फुलांची झाडे 1026 एवढी आहे तर इतर प्रकारची झाडे किती? असा गणिता संदर्भातली प्रश्न म्हणजेच सर्व विषयांना स्पर्श करणारा एकच वाक्यावरून निर्माण होणाऱ्या प्रश्नांची साखळी निर्माण तयार होते.


                                मित्रांनो अशी साखळी जर आपण अध्यापन करत असताना आणि मुलगा शिकत असताना निर्माण झाली तर जे काही शिकलो जाईल ते कधीही विसरला जाणार नाही यासाठीच्या आपल्याला साखळी निर्माण कराव्या लागतील. मित्रांनो जेव्हा आपण एखादा घटक शिकवत असतो तेव्हा त्या घटकात तुला स्पर्श करणारे अनेक विषय गोष्टी कथा संकल्पना असतात त्याच्या त्या वेळेला आपण स्पष्ट केल्या अनुभव दिले तर अतिशय अनुभव संपन्न समृद्ध मुलांचे शिकणे घडेल. आणि आपल्याला सतत म्हणावे लागणार नाही आणि तुला सांगितलेलं समजत नाही का ?  आठवत नाही का  ? कितीदा सांगायचं तुला? 

                                 म्हणूनच ज्या ज्या वेळी आपण मुलांना एखादी गोष्ट भाषा अंक किंवा संकल्पना समजून देत असतो तेव्हा पंचज्ञानेंद्रिय यांच्या आधारे मुलाने माहिती मिळवणे ,मिळवलेली माहिती साठवणे आणि साठवलेली माहिती ती पुन्हा वापरण्याची गरज निर्माण झाली की  बाहेर जाणं या गोष्टी  घडतात तेव्हा दीर्घकालीन स्मृतीमध्ये त्या चिरकला राहतात.


म्हणूनच मुलांच्या शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये साखळी निर्माण व्हायला पाहिजे.


 जर आपण ही साखळी निर्माण करू शकलो नाही तर स्मृती निर्माण होत नाही म्हणजेच लक्षात राहत नाही लक्षात येत नाही यासाठी आपली प्रत्येक घटक गोष्ट संकल्पना समजावून देत असताना आपल्याला त्या संदर्भातील साखळी निर्माण करता यायला पाहिजे.

                                 आपली स्मृती ही कशी काम करते बघा .....


आई आपल्या मुलाला एक मांजर दाखवते आणि ते मांजर आहे असं त्याला सांगते आणि जेव्हा मांजर कसा आवाज करतो तेव्हा तो मुलगा त्या मांजराचे चित्र

,त्याचा रंग ,त्याची उंचीही ,त्याची चाल आणि म्याव असा आवाज असे त्यामागचे गुणधर्म आणि मांजर ही अक्षरे आणि मांजर हा शब्द उच्चार आल्यानंतर चे ध्वनि हे सगळे स्मृतीत साठवून ठेवतो. 


     आता जर त्या मुलाला एका महिन्यानंतर किंवा अनेक वर्षानंतर पूर्वी पाहिलेल्या मांजरापेक्षा वेगळ्या रंगाचे आकाराचे आणि मुख्य म्हणजे वेगळ्या स्थितीमध्ये पोझिशन मध्ये बसलेला मांजर बघितलं तरी तो मुलगा क्षणार्धात ते मांजर आहे ओळखतो हे कसं होतं ........

                       आता या नव्या मांजराचा रंग बघून आपल्या मनातल्या कोट्यावधी प्रतिमान मधल्या फक्त काहीच निवडून त्यातल्या पूर्वीच्या मांजराची मॅच कराव्या लागतात .इथेही प्रतिमांची ही तुलना पंखा हत्ती किंवा इतर असंख्य गोष्टी माणसं कल्पना वगैरे सोडून आपल्या स्मृती मधील मांजरांची निवड केली जाते आणि हा निर्णयही क्षणार्धात होतो हे अजब आहे ...आपल्या स्मृती तील  मांजराचा आणि आपण बघत असलेल्या मांजराचा आकार आणि पोझिशन यांच्यात फरक असल्यानं त्यात कॉम्प्यूटरच्या भाषेत रोटेशन झूमिंग अशा तऱ्हेचे अनेक प्रकार करावे लागतात. त्यानंतरही त्या दोन प्रतिमा तंतोतंत जुळत नाहीत .मग त्यात बुद्धी आणि फजी लोजिक वापरून त्या प्रतिमा बऱ्याच मॅच होत आहेत हे बघून मग शेवटी ते मांजर आहे हे ओळखावं लागतं. हे सगळं क्षणार्धात होऊ शकतो. म्हणजे एक चमत्कारच आहे आणि हा चमत्कार कोणालाही सोडवता आलेला नाही आणि म्हणूनच मित्रांनो आपला मेंदू हा खरोखर एक चमत्कारच आहे.........

Your monthly grocery store. Buy up to 30% off


क्रमश : 

 सचिन बाजीराव माने 
आरफळ  सातारा

sachinmane0383@gmail.com 

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
अप्रतिम
खुपच सखोल आणि उदाहरणयुक्त असा लेख आहे . पुन्हा पुन्हा वाचावा असा .
कारण लेखातील माहितीचा ठसा आपल्या मेंदुवर उमटवायचा असेल तर पुन्हा पुन्हा वाचावाच लागेल .

प्रेरणा म्हणाले…
खूपच छान..विविध उदाहरणांसहित मांडणी..छान लेखन..!!
Sanjay chirkutrao Dhole म्हणाले…
खुप छान माहिती सर।
अनामित म्हणाले…
विप्प्सना मेडिटेशन s. N. गोयंका गुरुजी हे सुद्धा फार उपयुक्त आहे
अनामित म्हणाले…
विप्प्सना मेडिटेशन s. N. गोयंका गुरुजी हे सुद्धा फार उपयुक्त आहे