मेंदूत नक्की काय असतं ?

शिक्षण शाळा ते करिअर 

भाग एकोणविसावा

पालक-शिक्षक सर्वांसाठी


 मेंदूत नक्की काय असतं ?                 एखादी गोष्ट,अभ्यास  किंवा काम जर मुलांना जमले नाही ,तर आपण मुलांना ओरडत असतो.....

" काय रे तुला समजत नाही ,अक्कल नाही !!"

" डोक्यात काय कांदे-बटाटे भरलेत तुझ्या...! " 

" नुसता ढ  भोपळा आहेस ."

" मेंदू काय चालत नाही वाटतो तुझा ...!"

"  तुला मेंदू आहे का?" 

 सर्व कॉम्प्लिमेंट ऐकल्यानंतर मुलाला कळतच नाही... नक्की आपल्या मेंदूत  कांदे-बटाटे आहेत  की  भोपळा आहे ?
का आपल्याला मेंदूच नाही ? 

आणि त्यांना हेही माहीत नसतं की ज्यांनी मला या कॉम्प्लिमेंट दिल्यात ,त्यांना तरी माहिती आहे का ,नक्की मेंदूत काय असतं ?


मित्रांनो खरं सांगा आपल्याला तरी माहितीये का
 मेंदूत नक्की काय आहे ते ?आणि आपण मुलांना किती छान कॉम्प्लिमेंट देऊन बसतो .


 या कॉम्प्लिमेंट्स देण्यापेक्षा आपल्या मुलांना काय दिले म्हणजे त्याचा मेंदू चलाख  ,हुशार , तरतरीत  आणि  तल्लख  बनेल !!! मित्रांनो आपणच मुलांच्या मेंदूला पोषक गोष्टी देत नाही आणि आपणच त्यांना ओरडतो......... चूक आपली आणि शिक्षा मात्र मुलांना असते


चला तर मग पाहूया मेंदूच्या आत नक्की काय असते.

मेंदू व आपला सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे .आपला मेंदू 78% पाणी ,10% ते 12 % स्निग्ध पदार्थ ,8 टक्के प्रोटीन, 1% कार्बोहायड्रेट्स , 2% विरघळणारे ऑरगॅनिक आणि 1% ऑरगॅनिक यांनी मिळून बनलेला असतो.

 जगातल्या सर्व टेलिफोन मधून एका दिवसात जेवढे विजेचे सिग्नल असतात त्यापेक्षा एका मेंदूत फक्त एका दिवशी विजेचे जास्त सिग्नल वाहत असतात.

 आपल्या मेंदूत दररोज सरासरी 70000 विचार येत असतात .माणसाच्या मेंदूचे वजन शरीराच्या फक्त 2.5 टक्के असून हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्ता पैकी 15 ते 20 टक्के इतकं जास्त रक्त मेंदूकडे पाठवले जातात.

 मेंदूची रचना देखील एखादी सुंदर कलाकृती प्रमाणे असते .आपल्या मेंदूमध्ये 10,000 कोटी मज्जापेशी ( न्यूरॉन्स )असतात .आकाशगंगेत असणाऱ्या तार्‍यां एवढीच ही संख्या असते.

 दर सेकंदाला एक न्यूरॉन या प्रमाणे आपण मोजमाप करायला लागलो तर आपल्याला फक्त एका मेंदूतले मोजायला  3171 वर्षे लागतील .एका मेंदूतले सगळे न्यूरॉन  एकापुढे एक मांडले तर त्यांची लांबी एक हजार किलोमीटर एवढी होईल. प्रत्येक न्यूरॉन इतर एक हजार ते दहा हजार  न्यूरॉन्सना जोडलेला असतो .म्हणजेच प्रत्येक न्यूरॉन्स  मागे एक हजार ते 10 हजार इतके सिनॅप्स असतात.

मेंदूचे चार पोकळ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा द्रव असतो. या द्रवात ग्लुकोज कॅल्शियम प्रथिने सोडियम असे काही घटक असतात .हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा असतो .शरीराचं बुद्धीच सर्व काम याच्यामार्फत चालतं. बुद्धी तरतरीत राहण्यासाठी जो चांगला खाऊ पेशींना द्यायला हवा तो द्यायचं काम हा द्रवपदार्थ करत असतो.

वरिल लिंकला ट्च करा व आपल्या मुलंसाठी मेंदु विकासासाठीची Brain Quest खरेदी करा. आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ही मेदाम्ले ज्या पदार्थांमध्ये आहेत असा आहार असावा .त्यादृष्टीने जवस ,  कारळे  यांसारख्या तेलबिया .अक्रोड आहारात असणे आवश्यकच आहे .याशिवाय अंडी ,दूध दुग्धजन्य पदार्थ ,केळ सूर्यफुलाच्या बिया ,मासे ,चिकन,  मटण यातही मेदाम्ले असतात.आहारात शक्य तेवढी विविधता असली पाहिजे ही विविधत आपल्या शरीर बांधणीसाठी महत्त्वाचे असते.

 याबरोबरच आपल्या मेंदूला सातत्याने आवश्यकता असते ती 

प्राणवायूची, ग्लुकोजची आणि पाण्याची. 


प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन .वास्तविक ऑक्सिजनची गरज आपल्या संपूर्ण शरीरालाच असते. बघायला गेले तर मेंदूचे वजन आपल्या शरीराच्या केवळ दोन टक्के आहे मात्र संपूर्ण शरीराला जेवढा प्राणवायू लागतो त्यापैकी 20 टक्के प्राणवायू एकट्या मेंदूला लागत असतो .मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या मेंदूच्या कामांचा वेग किती प्रचंड आहे ते. हा प्राणवायू रोजच्या रोज पुरवणं हे आपलं काम आहे .व्यायाम करणं, चालणे, पळणे ,मैदानी खेळ खेळणे यातून हा प्राणवायू मेंदूला पोहोचत असतो. मेंदू सजन ठेवायचा असेल तर पाणी हवच .पाण्याची कमतरता भासली तर त्याचा दुष्परिणाम शिकण्याच्या प्रक्रियेवर होत असतो .  दिवसभर व्यवस्थितपणे पाणी पिलो तर त्याचा खूप चांगला परिणाम एकाग्रतेवर आणि स्मरणशक्तीवर होत असतो असं मेंदूचे अभ्यासक मानतात .अभ्यास करताना तसेच कोणतेही बौद्धिक काम करताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर ते बुद्धीला आलेली मरगळ घालवतं.

 आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ग्लुकोज. मेंदूला नितांत गरज असते . ग्लुकोज मुख्यता मिळते आहारातून. आहारातून मिळणारी ऊर्जा ही रक्तात मिसळली जाते आणि तिथून ती मेंदूकडे रवाना होते .आहार पोषक असेल तर मेंदूची तब्येत देखील चांगली राहते .मित्रांनो प्राणवायू पाणी आणि ग्लुकोज हे मेंदूला पुरवण्याचं काम आपल्याच हातात असतं .

यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण झोप 


मित्रांनो पूर्ण झोप ही मेंदूसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आपण झोपलो तरी मेंदूचं काम थांबत नाही. ते चालूच असतं .उलट झोपेच्या अवस्थेमध्ये मेंदूत घडणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी शिक्षण प्रक्रियेला मदत करत असतात .आपल्या मेंदूमध्ये प्रत्येक कृती करण्यासाठी एक विशिष्ट कार्यक्षेत्र असतं .भाषा विकास करण्याचं काम एका क्षेत्रात चालते .गणिताच्या क्षेत्रात गणित विकासाचं काम चालतं .सर्जनशील कृतींचे कार्यक्षेत्र वेगळच असतं .भावभावनांची संबंधित अनुभव वेगळे क्षेत्रांत संबंधित असतात. या सगळ्या गुंतागुंतीच्या कार्यक्रमांमध्ये मेंदू दिवसभर गुंतलेला असतो 
आणि जेव्हा रात्री आपण झोपतो तेव्हा दिवसभर केलेलं काम मेंदूच्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडतं ते कार्यक्षेत्रे झोपेत सुद्धा उद्दीपित होतात.
 याचा अर्थ असा की दिवसभर जे माहिती मेंदूला मिळाली होती .त्यावर शांतपणे काम चालू होतं .पूर्ण झोपेनंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आपला मेंदू उत्साहाने नवीन काम शिकण्यासाठी तयार होतो. आदल्या दिवशीच सर्व लक्षात राहते आणि म्हणूनच पूर्णवेळ झोपलो असता जे काही आधी आपण शिकलोय त्यावर प्रक्रिया झालेली असते आणि त्यामुळे आपली स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते. चांगलं शिकायचं तर त्यासाठी झोपही चांगली हवी .


वरिल लिंकला ट्च करा व आपल्या मुलंसाठी मेंदु विकासासाठीची विविध कोडी खरेदी करा.आणि शेवटी अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्या मेंदूच्या तल्लख  पणाशी  जोडलेली आहे ती म्हणजे भावना. आनंदी आणि सकारात्मक भावना मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तर नक्कीच फायद्याची ठरते .आनंदी भावना आणि सकारात्मक गोष्टींचा वाटा खूप मोठा असतो. अमिग्डाला हे भावनांचं केंद्र आहे .भीती ही भावना त्याला चटकन कळते. विशेषतः विविध प्रकारच्या भीतीची  सवय करून घेणे आणि त्या योग्य वेळेला भीतीच्या पूर्वानुभव यांची सर्व शक्तीनिशी जाणीव करून देणे हे त्याचं काम असत.

 ज्या कोणामुळे आणि ज्या कशामुळे पूर्वी भीती वाटत होती तो घटक जर समोर आला तर मेंदूकडून लगेचच सूचना मिळते -' लांब राहा.'  पूर्वीच्या भेटीच्या अनुभवाची आठवण करून दिली जाते. उदाहरणार्थ एखाद्या वेळेला जर गरम भांड्याचा किंवा आगीचा आपल्याला चटका बसला ,भाजलं, तर पुढच्या वेळेला आग पाहिली किंवा गरम वस्तू पाहिल्या की आपल्या मेंदूत धोक्याची सूचना देतो - 
' लांब रहा .' 

असाच प्रकार आपल्या आई बाबा किंवा शिक्षकांच्या बाबतीत घडतो .म्हणजे आई-वडील किंवा शिक्षकांनी अभ्यासावरून मारलं तर मेंदू या व्यक्तीबद्दल धोक्याची सूचना देतो आणि सांगतो- '  लांब राहा.'  म्हणजेच भीतीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

 आता समजलं का मारायचं नाही मुलांना ते. म्हणूनच अभ्यास करताना जर मुलाने एखादी गोष्ट समजली नाही तर समजून सांगणे हा उपाय आहे .मुलांना मारणं हा उपाय नाही. अभ्यासावरून आपण मुलांना सतत मारतो आणि त्यामुळे मुलंही लांब राहतात .मुलांचा मेंदू असे सांगतो की ही भीतीदायक गोष्ट आहे आणि आपण यापासून लांब राहिले पाहिजे .

त्याचबरोबर जर वातावरण अंधारमय दुःखमय असेल तर मनावर मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होतो. भीती वाटते. शाळेत घरात मुलांबरोबर जर  कठोर ,कडक वागणूक मिळाली तर तो नकारात्मक अनुभव नकोसा वाटतो .तिथून आपली सुटका करून घ्यावीशी वाटते.

 एखाद्या ठिकाणी अर्धा तास थांबावं असं वाटत नाही .ज्या ठिकाणी प्रेम नाही तिथं राहणं थांबणे थोडसं नकोसं वाटतं .बंदिस्त अंधारमय वातावरण असेल तर तिथून लगेच निघून जावसं वाटतं .अगदी असंच शाळेतील वर्गांमध्ये असणाऱ्या बंदिस्त वातावरणात ही असच घडतं. केवळ खडू-फळा तोच बेंच दिवसभर  खेटून बसायचं. शाळेच्या मधल्या सुट्टीत फक्त खेळायचं. या सर्व गोष्टी मुलांना कंटाळवाण्या वाटतात. त्यामुळे काही मुलांना शाळेत येण्यामध्ये आनंद वाटत नाही आणि दिवसभर एकाच जागी कंटाळवाणी शिक्षण होत असल्यामुळे शाळा सुटली की मुलं मोठ्या आवाजात ओरडत लोंढ्याने वेगाने बाहेर पडतात .याचं कारण त्यांची सुटका झालेली असते.


वरिल लिंकला टच करा व मेंदू विषयावरिल पुस्तके खरेदी करा 


 मुलांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असेल तर मुलांच्या स्मृती भोवती भावनांची गुंफण हवी आणि या भावना सुखद उल्हासित करणाऱ्या हव्यात. आनंदाची भावना मुलांमध्ये सुखद हार्मोन्स निर्माण करतात .ज्यांना पाहिल्यावर किंवा जिथे गेल्यावर हे सुखद हार्मोन्स निर्माण होतात, त्याच गोष्टी हव्याश्या वाटतात, खेळणारी ,हसणारी आनंदी माणसे मुलांना आवडतात, याचं कारण एकमेव हेच आहे .

लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे मुलांना मारून रागवून शिकवा, अभ्यासाला बसवा असं कोणी म्हणत नाही .मुलं चिडून ओरडून अभ्यासाला बसली  तर त्याचा कसा काय उपयोग होईल .त्यांनी शांतपणे अभ्यासाला बसायला हवं. मुलांमध्ये अभ्यासासाठी प्रसन्नता निर्माण करणारे वातावरण आपण निर्माण करायला हवे.
 शिकण्याच्या एकेका अनुभवात आनंदच असायला हवा .शिक्षकांनी दिलेली शाबासकी ,मुद्दाम घेतलेलं नाव, सर्व मुलांमध्ये आपल्याला दिलेली पाठीवरची  शाब्बासकीची थाप किंवा स्वतः सोडवलेले गणित, काढलेले उत्तम चित्र या सर्व आनंद देणाऱ्या गोष्टी मुलांना हव्याहव्याशा वाटतात.

 मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम आपल्या आई पेक्षा आजी जवळची वाटते. याचं कारण हेच आहे की आई मुलांना नेहमी  बदडत असते ,मारत असते, रागावत असेल पुन्हा जवळ घेते. परंतु मुलाच्या मनामध्ये मारामुळे भीती निर्माण होते .वडिलांच्या तर जवळ सुद्धा मुलं जात नाहीत मात्र आजीला बिलगून असतात जर कोणी घरातील मोठी माणसे ओरडली तर ती पटकन आजीच्या कुशीत जाऊन बसतात  .मित्रांनो याचं कारण नेमके काय ते तुम्हाला समजलं असेल 


याच बरोबर शिक्षा करणारे, रागावणारे, ओरडणारे शिक्षक मुलांना सहसा आवडत नाहीत .या उलट विनोद सांगणारे , जोरात न ओरडणारे ,गोष्ट सांगणारे शिक्षक मात्र सर्वांनाच आवडतात .कारण गोष्टींमध्ये भावना असतात. मात्र रूक्ष वाटणाऱ्या अभ्यासात त्या नसतात, म्हणून अभ्यासातील रुक्षपणा काढून मुलांना आनंद देऊन गोष्टीतून हसत-हसत शिकवणारे शिक्षक सर्व शाळेमध्ये लोकप्रिय असतात .

भावना ही मिळालेली माणसाला एक प्रकारची देणगीच आहे .भावनांचं बुद्धीशी वैर नसतं उलट भावनांमध्ये गुंतली तरी बुद्धी योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकते यालाच भावनिक बुद्धिमत्ता असेही म्हणतात. ती जोपासण्यासाठी योग्य भावना व्यक्त करणं  हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून हसा, आनंदी राहा दुसऱ्यालाही हसवा  आणि आनंदी ठेवा.वरिल लिंकला ट्च करा व आपल्या मुलंसाठी मेंदु विकासासाठीची Brain boosting activity books खरेदी करा.


 मेंदू नक्कीच  तल्लख आणि हुशार बनेल .

आपल्या श्वासोच्छवासापासून आपल्या सगळ्या भावभावना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या वाढीतले काही टप्पे फारच रंजक आहेत.

१)  ज्या मुलांचे पालक किंवा शिक्षक त्यांना मोठ्या आनंदाने गोष्टी म्हणून किंवा वाचून दाखवतात आणि तसेच त्यांच्याशी सतत संवाद साधतात त्या मुलांचा मेंदू झपाट्याने विकसित होतो.

२)  मुलं भाषा कशी शिकतात आणि त्यात मेंदूची भूमिका काय असते हे तपासायचे ठरवलं तर वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत जी मुलं किमान दोन भाषा शिकतात, त्या मुलांच्या मेंदूची रचना एकच भाषा शिकणार्‍या मुलांचे मेंदूपेक्षा थोडी वेगळी असते .

३) ज्या मुलांना लहानपणी ताणतणावांचे , भांडण-तंटे यांचे अनुभवायला लागतं त्या मुलांचे अध्ययन क्षमता कमी होते .

४) लहानपणी प्रोत्साहित करणारे वातावरण असेल तर शिकण्याची क्षमता 25 टक्‍क्‍यांनी वाढते असं संशोधनानं सिद्ध झाले .

५) सातत्याने नवीन गोष्टी शिकणाऱ्या माणसांच्या मेंदूमध्ये झपाट्याने बदल घडत असतात.

६)  लहानपणी  संगीत शिकणार्‍या मुलांचे अध्ययन क्षमता जास्त असते असे एका अभ्यासातून दिसून आले.

 ७)एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरून आपण त्याच्या मनात काय चाललंय हे बरेचदा ओळखू शकतो याला मेंदूतला अमिग्डा  हा भाग कारणीभूत असतो.

८ ) एका अभ्यासावरून असे सिद्ध झाले की एखाद्या सुगंधाची निगडित असलेल्या आठवणी आपल्या जास्त चांगल्या लक्षात राहतात.

९)  जेव्हा आपण काही आठवण्याचा प्रयत्न करतो किंवा एखादा नवीन विचार करतो तेव्हा मेंदूत नवीन सर्किट तयार होतात नवीन गोष्ट शिकण्याच्या आणि ती लक्षात ठेवण्याचे क्षमतेला डिक्लरेटिव्ह मेमरी असे म्हणतात.

१०)  मेंदूची योग्य वाढ होण्यासाठी लहान मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आपल्या मेंदूला दर मिनिटाला कॅलरीजची गरज असते ऑक्सिजनची गरज असते .

११ ) आपण जांभई देतो तेव्हा मेंदूला ऑक्सिजनचा जास्त पुरवठा होतो आणि तो जास्त उत्तेजित होतो .

१२) समाजामध्ये मिळून मिसळून राहण्यासाठी मेंदूतल्या ऑक्सिटोसिन या रसायनांची मदत होते .

अनेक जण असे म्हणतात की आपण आपल्या मेंदूचा फक्त दहा टक्केच वापरतो ,पण हे अजिबात खरं नाही .
अगदी बोटाने टिचकी वाजवणे या कृतीत सुद्धा आपल्या मेंदूचा जवळपास सगळा भाग काम करत असतो .


एकूण मेंदू हे एक भन्नाट गूढ आहे हे मात्र खरं!!!


तेव्हा कांदे-बटाटे फेकून द्या आणि मुलांना हव्या असणाऱ्या गोष्टी आनंद, सकारात्मक वातावरण, झोप, सकस आहार ,पाणी जितके देता येईल तितके द्या .म्हणजे  मुलांचा मेंदू तल्लख बनेल.


वरिल लिंकला ट्च करा व आपल्या मुलंसाठी मेंदु विकासाचे खेळ खरेदी करा. क्रमशः 
सचिन बाजीराव माने 
आरफळ सातारा
sachinmane0383@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या

अरुण मोजर म्हणाले…
खुप छान सकाळच्या प्रसन्न वातावरणात मन आणि मेंदू प्रसन्न कटणारा तुमचा आजचा लेख खुप आवडला . खरोखरच मेंदू हा गुढ आहे .
Salvi Suvarna Pramod. म्हणाले…
खूपच छान लेख👌👌💐💐
अनामित म्हणाले…
Good blog sir I like it
ghodakedg.blogspot.com
YES ! I CAN !!! म्हणाले…
🙏🏻आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहे.🙏🏻